दिव्यांग युवतीच्या आत्महत्येने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी (दि.१८) गंगापूर रोडवरील ध्रुवनगरात तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असे लिहून २१ वर्षीय दिव्यांग युवतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. दीक्षा दत्तू त्रिभुवन (रा. शिल्पा आनंदवन, क्रीडांगणाजवळ) असे मृत तरुणीचे नाव आहे.या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही.
स्वभावाने अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासू असलेली दीक्षा ही जन्मतःच दिव्यांग होती. ती शहरातील एका दिव्यांग विद्यालयात शिक्षण घेत होती. रविवारी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास दीक्षाने आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. कुटुंबीयांच्या हे लक्षात येताच तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेतील सर्वात हळहळजनक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी दीक्षाने आपल्या तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असा भावनिक संदेश लिहिला होता. शवविच्छेदनादरम्यान ही बाब समोर येताच कुटुंबीयांचा अश्रूंचा बांध फुटला.तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.दीक्षाच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार असून तिघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. या प्रकरणाचा तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत पाटील करत असून, आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.