विषारी पदार्थ खाल्ल्याने ४ मैत्रिणींचा मृत्यू , एक गंभीर; हत्या की आत्महत्या पोलिसांकडून तपास सुरु
विषारी पदार्थ खाल्ल्याने ४ मैत्रिणींचा मृत्यू , एक गंभीर; हत्या की आत्महत्या पोलिसांकडून तपास सुरु
img
वैष्णवी सांगळे
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील हसपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सैदपुर मोती बिगहा गावात खळबळजनक घटना घडली. सैदपुर मोती बिगहा या गावामध्ये राहणाऱ्या ५ अल्पवयीन मुलींनी अचानक टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या ५ मैत्रिणींनी एकत्र विषारी पदार्थ खाल्ला. या घटनेत चौघींचा मृत्यू झाला तर एकीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलीने मैत्रिणींसोबत विषारी पदार्थ खाल्ल्यानंतर घरी धाव घेत कुटुंबीयांना सांगितले. त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

तर, विषारी पदार्थ खाल्ल्यानंतर चौघीजणी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेल्या. त्याठिकाणीच त्यांचा तडफडून मृत्यू झाला. चारही मुलींचे मृतदेह एका शेतात सापडले. धक्कादायक म्हणजे, त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना कळवले नाही, शवविच्छेदन केले नाही किंवा औपचारिक तक्रार दाखल केली नाही. त्यांनी चारही मुलींवर एकत्रितपणे अंत्यसंस्कार केले. जेव्हा ही बातमी सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर वेगाने पसरू लागली तेव्हा जिल्हा प्रशासनाने कारवाई केली.

रविवारी, दौडनगरचे एसडीपीओ (पोलीस उपअधीक्षक) गावात आले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी गावकऱ्यांची चौकशी केली, परंतु पाचही मुलींनी एकत्र विष प्राशन केले आहे याची कोणीही स्पष्टपणे पुष्टी केली नाही.

एसडीपीओ म्हणाले की, मुलींनी स्वतः विष प्राशन केले की कोणीतरी त्यांना दिले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विष प्राशन करण्याचे कारण देखील अद्याप समजलेले नाही. वाचलेल्या मुलीकडून जबाब मिळाल्यानंतरच प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.सध्या, पोलीस गावकऱ्यांची चौकशी करत आहेत, घटनास्थळाची तपासणी करत आहेत आणि रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीशी बोलण्याची तयारी करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group