अहिल्यानगर जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. १५ वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिला तब्बल पाच दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे, राहुरी तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे.
राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिक-सुरत रोडलगत रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका केली आहे. तर या प्रकरणात मुख्य आरोपी मुक्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण , आकाश शरद संसारे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
१३ फेब्रुवारी रोजी शाळेत जाते असं सांगून घराबाहेर पडलेली १५ वर्षीय मुलगी घरी परतलीच नाही. त्यामुळे पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने हलवली आणि अखेर जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं.
या प्रकरणात पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद ठेवण्यात आला होता.