संतापजनक ! कैऱ्या कापायच्या अडकित्त्यानेच आईची हत्या, नंतर मृतदेहाशेजारी गोट्या खेळत बसला
संतापजनक ! कैऱ्या कापायच्या अडकित्त्यानेच आईची हत्या, नंतर मृतदेहाशेजारी गोट्या खेळत बसला
img
वैष्णवी सांगळे
अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात मंगळवारी दुपारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या थरारक घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. पैशांच्या किरकोळ वादातून मुलाने स्वतःच्या आईचा अडकित्त्याने वार करत निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेहाशेजारी शांतपणे गोट्या खेळत बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवलेनगर परिसरातील गजानन मंदिरासमोरील भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. बेबी सुधाकर गवारे (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा सुहास सुधाकर गवारे (वय ३३) याला पोलिसांनी अटक केली आहे.

मयत आई व मुलगा नवलेनगर भागात भाड्याच्या खोलीत राहत होते. त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे. मुलगा आईकडे सतत पैसे मागायचा. पैसे दिले नाही म्हणून मुलगा सुहास याने मयत आईला मंगळवारी बेडरुममध्ये डांबून ठेवले. पैसे न दिल्याच्या रागातून त्याने कैरी कापण्याच्या अडकित्याने वार करत आईला जीवे ठार केले. हा प्रकार परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी पोलिसांना कॉल करून ही माहिती कळवली. पोलिसांचे पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा मुलगा घरात पलंगावर एकटाच गोट्या खेळत बसलेला असल्याचे पोलिसांना खिडकीतून दिसले. 

पोलिसांनी त्याला दरवाजा उघडण्यास सांगितले; पण बराच वेळ झाला तरी त्याने दरवाजा उघडला नाही. त्याने दरवाजाला आतून पलंग व धान्याच्या कोठ्या लावल्या होत्या. हातातील कात्री, अडकित्ता व खेळण्याच्या गोट्या तो पोलिसांना दाखवून स्वतःशीच बडबडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतले. मृतदेह मयत महिलेचा शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गवारे कुटुंब हे कोपरगाव तालुक्यातील आहे. मयत बेबी गवारे या मुलगा सुहासा याच्यासह अहिल्यानगरमधील भाड्याच्या खोलीत राहत होत्या. मयत गवारे या दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाचे काम करून घर चालवित होत्या. मुलाला नोकरी मिळत नव्हती आणि त्याचे लग्नही होत नव्हते, त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता. मयत महिलेची मुलगी सुवर्णा दिगंबर घुले यांनी मंगळवारी रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून फिर्यादीचा भाऊ सुहास याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने कैऱ्या कापण्याचा अडकित्त्याने आईचा खून केला, असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

मुलगा मनोरुग्ण की नशेत?
आईच्या खुनाबाबबत पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने माझ्याकडून चूक झाली असल्याची कबुली दिली. मुलगा मनोरुग्ण असल्यासारखा वर्तन करत होता. तो नशा केल्यामुळे असे वागत असावा, असाही पोलिसांना संशय आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group