अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत शुक्रवारी मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पूर्वी, सन २०१८ मध्ये अपशब्द काढल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदम याला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप व विरोधी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांनी आज, शुक्रवारी एकत्रितपणे महापालिका सभागृहातून बाहेर काढले.
अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना श्रीपाद छिंदम याने प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर नगरसेवकांनी त्याला बोलू देणार नाही असा ठाम पवित्रा घेतला. यामुळे सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि अखेरीस श्रीपाद छिंदमला सभागृहाबाहेर काढण्यात आलं. या गोंधळादरम्यान काही नगरसेवकांनी श्रीपाद छिंदम समोर असलेला माईक आणि अर्थसंकल्पाचे कागद फेकून दिल्याचीही घटना घडली. त्यामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.
या घटनेनंतर श्रीपाद छिंदम याने अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, शहर पोलीस अधीक्षक दिलीप टिपरसे यांची भेट घेत नगरसेवकांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली तसेच यामागे आमदार सूत्रधार असल्याची तोंडी तक्रार केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला लेखी तक्रार देण्याची सूचना केली.
माध्यमांशी बोलताना त्याने शहराचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर टीका करत, 'आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्यास आमदार जगताप आणि त्यांच्या पक्षाचे नगरसेवक जबाबदार असतील' असा गंभीर आरोप केला.दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांसह इतर नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत, 'श्रीपाद छिंदमला सभागृहात बोलण्याचा अधिकार नाही. त्याला सभागृहात येऊ देणार नाही' असा इशारा दिला आहे. तसेच महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकारच नाकारला जावा, असा कायदा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.