अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे 'दत्तधाम सरकार' नावाचा आश्रम चालवणारा भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे याने भोंदूगिरीच्या बाबतीत नाशिकच्या कुख्यात अशोक खरातलाही मागे टाकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत त्याचे २०० हून अधिक संशयास्पद व्हिडिओ आणि ९० हून अधिक संशयास्पद औषधे जप्त केली असून, हे सर्व साहित्य आता फॉरेन्सिक आणि वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भोंदूबाबा गेल्या १० वर्षांपासून भोंदूगिरीचा हा गोरखधंदा चालवत होता. स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे भासवून तो कॅन्सरसारखे दुर्धर आजार मंत्राने बरे करण्याचे तसेच अपत्यप्राप्तीचे खोटे आमिष दाखवून सर्वसामान्य भाविकांची मोठी आर्थिक फसवणूक करत होता. या उपचारांच्या नावाखाली तो रुग्णांच्या नातेवाईकांकडून ११ हजार रुपयांपासून ते ५१ हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळत असल्याचे उघड झाले आहे.
गुरुवारी, रविवारी आणि अमावस्येच्या दिवशी या भोंदूबाबाचा मोठा दरबार भरत असे आणि या दरबारात शेकडो लोकांची मोठी गर्दी होत होती.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव रंजना गवांदे यांनी या संदर्भात पुराव्यांसह पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत संगमनेर पोलिसांनी पहाटे धाड टाकून भोंदूबाबा राजेंद्र गडगे याला त्याच्या साथीदारासह बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी त्याचा संपूर्ण आश्रम सील केला असून तेथून मोठ्या प्रमाणावर गोळ्या आणि औषधांचा साठा हस्तगत केला आहे. ही औषधे कसली आहेत आणि भोंदूबाबा त्यांचा वापर नेमका कशासाठी करत होता, याची उकल प्रयोगशाळेच्या अहवालानंतर होणार आहे.
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती या भोंदूबाबाच्या आर्थिक साम्राज्याची धक्कादायक माहिती लागली आहे. भोंदूगिरीच्या माध्यमातून त्याने कोट्यवधींची माया गोळा केली असून संगमनेर, अहिल्यानगर, नेवासा आणि राहाता परिसरात त्याच्या कुटुंबाच्या नावावर तब्बल १३ मालमत्तांची कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत.
याशिवाय वेगवेगळ्या १० बँकांमध्ये त्याची खाती आढळली असून पोलिसांनी ही सर्व खाती आणि आर्थिक व्यवहार रडारवर घेतले आहेत. या आश्रमात लाखो रुपयांची वीज चोरी होत असल्याचेही महावितरणच्या कारवाईत उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी राजेंद्र बापू गडगे आणि त्याचा साथीदार मधुकर शिंदे यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यात औषध पुरवठा करणारा डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे आणि सुरज शिंदे हे तिघे आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या सर्व आरोपींवर जादूटोणा विरोधी कायदा आणि औषध चमत्कारी उपाय कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.