भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेला अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात हा पुन्हा एकदा विशेष तपास पथकाच्या (SIT) संपर्कात आला आहे. त्यामुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आज एसआयटीकडून हर्षवर्धन खरात आणि अशोक खरातची मुलगी या दोघांचीही कसून चौकशी केली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन खरातला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान वडील अशोक खरात यांच्याबद्दल धक्कादायक त्याने खुलासा केला होता. आमच्या घरात मोठ्या प्रमाणात कॅश यायची. हे पैसे कुठून आणि कसे यायचे याबद्दल मला माहिती नाही. पण डॅड या कॅशचे नियोजन करायचे. त्यांना प्रत्येक व्यवहाराची माहिती होती, अशी कबुली हर्षवर्धन खरातने दिली होती.
हर्षवर्धन खरातने दिलेल्या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी सोडून दिलं होतं. मात्र, त्यानंतर तो अचानक गायब झाला होता. यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली होती. मात्र आता तो पुन्हा संपर्कात आल्याने पोलिसांना या रॅकेटमधील महत्त्वाचे दुवे हाती लागण्याची शक्यता आहे. पण अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही अद्यापही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
आजचा दिवस तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अशोक खरातच्या न्यायलयीन कोठडीची मुदत आज संपत आहे. उद्या म्हणजेच बुधवारी अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.