नाशिक : ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाने आता गंभीर आणि व्यापक स्वरूप धारण केले असून, त्याचे पडसाद थेट राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात नाशिकमधील या भोंदूबाबाशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, विकृत कृत्य करणाऱ्या बाईचा गुरु हा भोंदू बाबा आहे आणि दर पंधरा दिवसांनी त्या नाशिकला जात होत्या. दर पंधरा दिवसांनी त्यांना पप्पा म्हणत होत्या, डॅडी म्हणत होत्या, शुगर डॅडी म्हणत होत्या, याबाबत मला माहिती नाही. कुठल्या बाईने कुठे फिरावे? कोणाशी बोलावे? याचे वैयक्तिक स्वातंत्र्य असले तरी देखील संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अत्यंत जबाबदारीने वागणे गरजेचे असते, अशी टीका त्यांनी केली.
रुपाली पाटील ठोंबरे पुढे म्हणाल्या की, त्यांना जनाची नाही तर बाई म्हणून मनाची देखील लाज नाही, हे कालच्या राजीनामा देतानाच्या फोटोवरून दिसून आले. हसत आहेत, कुठलं वैयक्तिक कारण होतं? अगं वेडी आहेस का बाई तू? मनोरुग्ण आहेस का? कुठला नरेटीव्ह सेट करत आहेस? कुठले वैयक्तिक कारण? त्या भोंदूबाबाचे पाय तुझ्या नवऱ्याला लाव. आम्हाला काही देणंघेणं नाही. परंतु, महत्त्वाच्या पदावर बसून जो बालिशपणा चाललेला आहे तो हा महाराष्ट्र सहन करणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले.