नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर, आज अशोक खरातला 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातला 18 एप्रिलपर्यंत (5 दिवस) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खरातने पोलिसांनी मारहाण केली नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान खरातचे वकील ॲड. सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध केला. मागील गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी असाच युक्तिवाद केला होता आणि तो तपास झालेला आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नाही, असा दावा त्यांनी केला. मात्र, सरकारी पक्षाने हा गुन्हा वेगळ्या महिलेशी संबंधित असून तपास महत्त्वाचा असल्याचे सांगितल्याने न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी मंजूर केली.
अंजली दमानिया मोठा गौफ्यस्फोट करणार
दरम्यान, अशोक खरातच्या दरबारात बडे राजकारणीच नाही तर प्रशासकीय सेवेतील अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षकांनही हजेरी लावल्याचे म्हटले जात आहे. 1825 नंबर्सवरून खरातला फोन आले आहेत. तर काही जणांना खरातने फोन केला आहे. या सर्वांची कुंडलीच अंजली दमानिया उद्या सर्वांसमोर आणणार आहेत. खरातला कॉल करणाऱ्यांची यादीच त्या जाहीर करण्याची शक्यता आहे. राजकारण्यांची नावं ऐकूण धक्का बसेल असा दावा त्यांनी केला आहे.
अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. 1825 नंबर्सवरून खरातला फोन आले आहेत. त्यात पोलीस निरीक्षक, तहसीलदारापासून ते अनेक अधिकारी आहेत. अशोक खरात याने यंत्रणेचा वापर केला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी त्याने हा वापर केला आहे. राजकारण्यांना सुद्धा मोठा फायदा मिळवून दिल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. याविषयीचा मोठा खुलासा दमानिया उद्या पत्रकार परिषदेत करणार आहेत.