Ashok Kharat: अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजा, अमोल मिटकरींचा अशोक खरात प्रकरणावर गंभीर आरोप
Ashok Kharat: अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजा, अमोल मिटकरींचा अशोक खरात प्रकरणावर गंभीर आरोप
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू ज्योतिषी अशोक खरातच्या बाबतीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशोक खरातच्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर विश्वस्त असल्यामुळे त्यांच्यावरही टीका होत आहे. त्यांचेही अनेक फोटो समोर आले आहेत. भोंदू अशोक खरातविरुध्द एका महिलेने अत्याचाराची तक्रार केल्यानंतर त्याचे बिंग फुटले. दरम्यान, रूपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. मिटकरी यांनी या प्रकरणाचा संबंध थेट अजित पवारांच्या विमान अपघाताशी जोडला आहे. 

आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं की, नाशिकच्या कॅप्टन खरातचे व्हीएसआर कंपनीशी संबंधित फोटो समोर आलेत. हा नराधम, भामटा बाबा होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ हाती लागतेल. राजकीय लोकांचा गॉडफादर, नेत्यांचा सल्लागार असलेला हा बाबा होता. त्याचे कृत्य जनतेसमोर आले आहे. २८ जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला. ज्या VSR कंपनीच्या विमानाचा अपघात झाला त्याच्याशी भोंदूबाबाचे कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. VSR कंपनीच्या नादुरुस्त विमानात बसण्याचा सल्ला कदाचित या भोंदूबाबाने दिला असावा हे नाकारता येत नाही. हा अध्यात्मातील नव्हे राजकीय बाबा होता. राजकारणात यश मिळण्यासाठी बळी घेण्याचा सल्ला दिला असेल. अजितदादा अघोरी प्रथांपासून दूर असायचे. पवार कुटुंबातील कुणीही यावर विश्वास ठेवत नाही. परंतु विमान अपघाताच्या १ महिन्यापूर्वी मुंबईतील देवगिरी, बारामतीतील सहयोग बंगल्याबाहेर अघोरी पूजेचा प्रकार आढळला होता असा आरोप त्यांनी केला. 

तसेच या पूजेत लिंबू पुजले होते, कुंकू हळद होते. कुणाच्या तरी सांगण्यावरून हा अघोरी प्रकार केला गेला होता का? आता व्हीएसआर विमानासोबत या बाबाचे फोटो पाहता त्याचे या कंपनीच्या मालकासोबत राजकीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी असेल सीआयडी असेल त्यांनी या भोंदूबाबाचे २६ ते ३१ जानेवारीपर्यंतचे कॉल डिटेल्स काढावेत. हा कुणाच्या संपर्कात होता. अजित पवार बायरोड बारामतीला जाणार होते, परंतु त्यांना विमानाने जायला लावा असं या बाबाने कुणाला सांगितले का? व्ही.के सिंगला सांगून नादुरुस्त विमानाने अजित पवारांना जायला भाग पाडले का? अशी शंकाही मिटकरी यांनी उपस्थित केली. 

दरम्यान, विमानात इंधनाचा साठा होताच परंतु आणखी काही विषारी द्रव्ये भरले होते असं आम्हाला कळते. त्यामुळे जेव्हा हे विमान लँडिग होत होते तेव्हा हे विषारी द्रव्ये सोडले गेले असावे. त्यामुळे विमानातील पायलट, क्रू मेंबर्स आणि इतर प्रवासी बेशुद्ध पडले असावेत त्यानंतर विमानाचा अपघात होऊन त्याचा स्फोट झाला. ही शक्यताही नाकारता येत नाही. विषारी वायूचा प्रयोग केला गेला आहे का? VSR कंपनीवर एफआयआर घेतला नाही. त्या कंपनीच्या मालकाला अटक झाली नाही. त्यामुळे या अपघाताचे धागेदोरे नाशिकच्या आश्रमापर्यंत येऊन पोहचतात. या भोंदूबाबाचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात त्याचे उत्तर नाशिकच्या खरात प्रकरणात दडलेले असेल असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group