नाशिक  : वासनांध अशोक खरात कसा अडकला ? ऑफिसमधील 'तो' व्यक्ती अन हादरवणारी कहाणी समोर
नाशिक : वासनांध अशोक खरात कसा अडकला ? ऑफिसमधील 'तो' व्यक्ती अन हादरवणारी कहाणी समोर
img
वैष्णवी सांगळे

नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यासह देशातील बड्या नेत्यांशी खरात यांचे संबंध असल्याने याप्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे. 

स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या भोंदू अशोक खरातचे अश्लील व्हिडीओ समोर आले होते. पण या प्रकरणाने ट्विस्ट घेतला. 29 डिसेंबरचा फिर्यादी, 18 मार्च रोजी आरोपी झाला. मात्र, अशोक खरातचे 58 व्हिडीओ समोर कसे आले? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला होता. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आलीये. या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून, या संपूर्ण दुष्कृत्याचा खरा मास्टरमाईंड कॅप्टन खरातचा ऑफिसबॉय संशयित नीरज जाधव असल्याचे समोर आले आहे. 

अशोक खरातच्या मर्जीतील ऑफिस बॉय संशयित नीरज जाधव यानेच सगळा गेम केला, अशी माहिती समोर येत आहे. नीरज जाधव हा प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं समजतंय. डिसेंबर 2025 मध्ये नीरजनेच खरातच्या नकळत महिलांवरील कार्यालयातून 58 बलात्काराचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.  नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील 'ओजस प्रॉपर्टीज' या कार्यालयात स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातने अनेक महिलांवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ, मॉर्फ व्हिडिओ, फोटो व पुरावे सीसीटीव्हीच्या रूपाने जतन केले होते. खरातचा विश्वासू असलेला नीरज जाधव याने डिसेंबर 2025 साली खरातच्या नकळत कार्यालयातून या 58 महिलांवरील अत्याचाराचे फुटेज चोरले. नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने या व्हिडीओंच्या जोरावर खरातलाच ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. 

नीरज आणि त्याच्या साथीदारांनी या क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, खरातने या मागणीला दाद न देता पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करीत थेट वावी पोलिसांत फिर्याद नोंदविली होती. त्यामुळे नीरजने आपला मोर्चा थेट पीडित महिलांकडे वळवून त्यांच्या अब्रूचा बाजार मांडला. यानंतर, नीरज व इतरांनी शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेचे मॉर्फ फोटो आणि काही व्हिडीओ थेट तिलाच व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकावले होते. 

पीडिता मंदिरात दर्शन घेत असताना नीरजसह संशयिताने तिला गाठून व्हिडीओ दाखविले. ती घाबरली व तिने ही बाब खरातला सांगितली. पण खरातने स्वतःला वाचवण्यासाठी तिलाच पोलिसात जाण्यास सांगितले. खरातकडून पैसे मिळण्याची आशा मावळताच नीरजने सिडकोतील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठविला. नीरजचा हाच मास्टरस्ट्रोक त्याच्यावर आणि खरातवर उलटला. मेहुण्याने धीर दिल्याने या पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद देत अशोक खरातच्या वासनांधाचा खरा चेहरा जगासमोर आणला.

दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, 18 मार्च रोजी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक खरातला ताब्यात घेतलं होतं. आता त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group