'दैवी अवतार' असल्याची बतावणी करत भोंदू अशोक खरात याने अनेकांची फसवणूक केली आहे. अनेकांना गंडा घालणारा अशोक खरात आता त्याच्याच जाळ्यात अडकत चालला आहे. पोलीस कोठडीचा फास जसजसा घट्ट होत आहे, तसतसा त्याचा अहंकार कमी होत आहे. सध्या एसआयटीकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीत तो अनेक धक्कादायक खुलासे करत आहे. तर काही वेळा तो अजब उत्तरं देत पोलिसांना बुचकाळ्यात टाकत आहे.
माहितीनुसार, पोलीस कोठडीच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत अशोक खरातचा तोरा काही वेगळाच होता. " तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल," असे म्हणत तो चक्क तपास करणाऱ्या पोलिसांचेच भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, एसआयटी (SIT) आणि ईडीच्या (ED) वाढत्या चौकशीमुळे आता त्याची बोलती बंद झाली आहे. आपण आता सहज तुरुंगातून बाहेर पडणार नाही, याची खात्री त्याला पटली असून तो स्वतःच्या भविष्याबद्दल कमालीचा चिंतेत आहे.
कोठडीत खरात आता जास्त कोणाशी बोलत नाही. तपासादरम्यान विचारलेल्या प्रश्नांनाही तो त्रोटक उत्तरे देत आहे. चिंतेमुळे त्याचे जेवणही कमी झाले असून तो तासनतास शांत बसून असतो, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, बाहेर पडल्यानंतर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीने, न्यायालयातील सुनावणी प्रत्यक्ष न होता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारेच व्हावी, अशी विनंती तो अधिकाऱ्यांकडे वारंवार करत आहे.
दरम्यान, अशोक खरातला अटक केल्यापासून त्याची पत्नी कल्पना खरात फरार आहे. ती नेमकी कुठे आहे? याचा काहीही थांगपत्ता लागत नाहीये. मागील जवळपास २५ दिवसांपासून पोलीस तिचा शोध घेत आहेत. मात्र तिच्याबद्दल काहीच माहिती समोर येत नाही. तर ती कुठे आहे? असा प्रश्न जेव्हा तपास अधिकाऱ्यांनी विचारला, तेव्हा खरातने "ते देवालाच माहीत" असे म्हणत हात झटकले.
भोंदू अशोक खरातला आज (दि. 13) पुन्हा नाशिक कोर्टात हजर केले जाणार आहे. अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार असल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तर चौथ्या गुन्ह्यात पुन्हा आज अशोक खरातला पोलीस कोठडीत मिळण्यासाठी एसआयटी प्रयत्न करणार आहे.