नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड व नवीन घाट येथे आयोजित ध्वजारोहण सोहळ्यासाठी महामहिम राष्ट्रपती महोदया व मा. मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाच्या दिवशी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, नागरिक आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवणे, वाहतुकीची कोंडी टाळणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या तसेच त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक अधिसूचनेचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांनी मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ अन्वये दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदलांबाबत अधिसूचनेनुसार नाशिक-पिंपळगाव बहुला-संदीप फाउंडेशन-खंबाळे-पेगलवाडी फाटा-त्र्यंबकेश्वर या पूर्वीच्या मार्गाऐवजी अमृत चौक-बारदान फाटा-गोवर्धन-गिरणारे-धोंडेगाव-देवरगाव-वाघेरा फाटा-अंबोली फाटा-सापगाव-त्र्यंबकेश्वर हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणाऱ्या वाहनांसाठी जव्हार मोखाडा- अंबोली-त्र्यंबकेश्वर- पेगलवाडी-खंबाळे-संदीप फाउंडेशन-नाशिक या मार्गाऐवजी जव्हार-मोखाडा-अंबोली टी पॉइंट-वाघेरे फाटा-कोने-साप्ते-देवरगाव-गिरणारे-गोवर्धन-नाशिक या मार्गाचा वापर करावा.
मुंबई बाजूकडून येणाऱ्या वाहतुकीसाठी वैतरणा फाटा मार्गे-पहिने-त्र्यंबकेश्वर या मार्गाऐवजी वेतरणा फाटा-नाशिक-अमृतगार्डन-बारदान फाटा-गोवर्धन-गिरणारे-धोंडेगाव-त्र्यंबकेश्वर हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच पहिने-पेगलवाडी-नाशिक या मार्गावरील वाहतुकीसाठी पहिने-आहुर्ली-सांजेगाव-वाडीव-हे-नाशिक, तर पहिने-पेगलवाडी-त्र्यंबकेश्वर या मार्गावरील वाहतुकीसाठी पहिने-भिलमाळ-निरगुड पाडा-जांभुळपाडा-सापगाव-त्र्यंबकेश्वर या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाहतूक बदलाच्या कालावधीत संबंधित मार्गांवर आवश्यक दिशादर्शक व वाहतूक चिन्हे लावण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी कार्यवाही करावी असे अपर जिल्हादंडधिकारी श्री. राजपूत यांनी आदेशात नमुद केले आहे.