नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा कमावण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्यासह चार जणांनी एका इसमास 75 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फेब्रुवारी ते दि. 19 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आरोपी मिलिंद गाढवे, त्याची पत्नी प्रियंका गाढवे, तिचा भाऊ अर्जुन पाटील, नीलेश व हेमंत जंगम यांनी फिर्यादीशी संपर्क साधला. फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीला ऑनलाईन झूम मीटिंगद्वारे त्यांच्याशी चर्चा केली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
त्यानंतर सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना मयन एंटरप्रायजेसच्या बंधन बँकेच्या खात्यावर 75 लाख रुपये भरावयास लावले. आरोपींनी सांगितल्यानुसार फिर्यादीने ही रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली; मात्र बरेच दिवस होऊनही गुंतविलेल्या रकमेवर जादा नफा मिळाला नाही.
यावरून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.