नाशिक : हॅलो, पिंप्रीकर हॉस्पिटलमधून बोलतोय... ऑनलाईन व्यवहारासाठी लिंक पाठवली अन क्षणात दोघांनी लाखो गमावले
नाशिक : हॅलो, पिंप्रीकर हॉस्पिटलमधून बोलतोय... ऑनलाईन व्यवहारासाठी लिंक पाठवली अन क्षणात दोघांनी लाखो गमावले
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पिंप्रीकर हॉस्पिटलमधून बोलत असल्याचे भासवून टोकनसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर लिंकवर पाठवून त्याद्वारे एका महिलेसह इसमाच्या बँक खात्यावर ऑनलाईन व्यवहार करून सुमारे सव्वादोन लाख रुपयांची रक्कम काढून फसवणूक करणार्‍या इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ज्योती पंडितराव गिते (रा. पार्कसाईड होम्स, हनुमाननगर, पंचवटी) यांनी दि. 18 सप्टेंबर रोजी जस्ट डायलवर कॉल करून पिंप्रीकर हॉस्पिटलचा नंबर घेतला होता. त्यानंतर काही वेळाने गिते यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात इसमाने कॉल करून पिंप्रीकर हॉस्पिटलमधून बोलत असल्याचे सांगितले. 

त्यानंतर हॉस्पिटलच्या टोकनसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर अज्ञात इसमाने अन्य क्रमांकांवरून एपीके लिंक पाठविली. त्यात फिर्यादीची सर्व माहिती भरावयास सांगून दि. 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास फिर्यादी गिते यांच्या संमतीशिवाय ऑनलाईन व्यवहार करून फिर्यादीच्या बँक खात्यातून 1 लाख 39 हजार रुपये काढून ती रक्कम आयएमपीएसद्वारे ट्रान्स्फर करून ऑनलाईन फसवणूक केली. 

तसेच महेंद्र उत्तम कापसे (रा. श्रीरामनगर, आडगाव शिवार, नाशिक) यांचीही अज्ञात इसमाने अशाच पद्धतीने फसवणूक करून 88 हजार रुपये परस्पर काढून घेतले. या दोन्ही प्रकरणांत एकूण 2 लाख 27 हजार रुपयांची रोकड लिंकद्वारे काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दोन मोबाईल क्रमांकधारक इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.


Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group