राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस.दरम्यान आज नाशिकमध्ये अर्ज माघारीच्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला आहे. अर्ज माघारीवरून सिडको येथे जोरदार राडा झाला.
भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाठ आणि इच्छुक उमेदवार देवानंद बिरारी तसेच त्यांच्या पत्नी वंदना बिरारी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि तो वाद नांतर चांगलाच पेटला.
प्रभाग क्रमांक 31 मधून वंदना बिरारी या इच्छुक उमेदवार होत्या. मात्र भाजपाने अधिकृत उमेदवारी बाळा शिरसाठ यांना दिल्याने बिरारी दाम्पत्य नाराज होते. आज वंदना बिरारी आणि त्यांचे पती देवानंद बिरारी हे माघार घेण्याच्या प्रक्रियेसाठी सिडको महापालिका कार्यालयात आले असताना वादाला तोंड फुटले.
शाब्दिक वादानंतर परिस्थिती बिघडली आणि दोन्ही बाजूंमध्ये वाद चिघळला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे.