राज्यसभा निवडणुकीत भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही जिंकल्या 'इतक्या' जागा
राज्यसभा निवडणुकीत भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही जिंकल्या 'इतक्या' जागा
img
वैष्णवी सांगळे
हरयाणा, बिहार, ओडिशा येथील ११ राज्यसभा जागांसाठी सोमवारी निवडणुका झाल्या. या तिन्ही राज्यांमध्ये एकूण १४ उमेदवार मैदानात होते. बिहारच्या सर्व ५ जागांचे आणि ओडिशाच्या ४ जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यावर एनडीएच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी प्रत्येकी ४४ मतांसह विजय मिळवला. रामनाथ ठाकूर यांना ४२ मते आणि उपेंद्र कुशवाहा यांना ४२ मते मिळाली. ओडिशामध्ये भाजपचे मनमोहन सामल, सुजीत कुमार आणि एनडीएने पाठिंबा दिलेले उमेदवार दिलीप रे यांनी विजय मिळवला. 

बिहार आणि ओडिशात विरोधी पक्षांचे आमदार फुटल्यानं त्याचा फायदा थेट भाजपप्रणित रालोआला झाला. बिहारमध्ये ५ जागांसाठी ६ उमेदवार मैदानात होते. यापैकी ५ राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे तर १ इंडिया आघाडीचा होता. रालोआने बिहारमध्ये पाचही जागा जिंकल्या. मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन, जदयू खासदार रामनाथ ठाकूर, आरएलएम प्रमुख उपेंद्र कुशवाह आणि भाजपचे शिवेश राम हे विजयी झाले.

बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी उमेदवारांना ४१ मतांची आवश्यकता होती. बिहारच्या २४३ आमदारांपैकी एनडीएकडे २०२ आमदार आहेत. त्यामुळे राज्यसभेची पाचवी जागा जिंकण्यासाठी त्यांना ३ मतं कमी पडत होती. तर इंडिया आघाडीकडे ३५ आमदार होते. त्यांना विजयासाठी आणखी ६ मतं आवश्यक होती.

इंडिया आघाडीला एमआयएम आणि बसपाने पाठिंबा दिल्यानं उमेदवार एडी सिंह यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण अखेरच्या क्षणी काँग्रेसचे ३ आणि राजदच्या एका आमदाराने मतदानाला अनुपस्थिति लावल्याने इंडिया आघाडीला फटका बसला.प्रथम प्राधान्याच्या मतांमध्ये निकाल न लागल्यानं दुसऱ्या प्राधान्याच्या मतांची मोजणी झाली. यात भाजपच्या शिवेश राम यांनी सहज विजय मिळवला. राज्यसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर इंडिया आघाडीकडून आमदारांना धमकी दिल्याचा आणि घोडेबाजार झाल्याचा आरोप केला आहे.

ओडिशातही ४ जागांसाठी पाच जण मैदानात होते. इथं विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला ३० मतांची गरज होती. भाजपच्या मनमोहन सामल आणि सुजीत कुमार यांनी विजय मिळवला. तर बीजेडीचे संतृप्त मिश्रा हेसुद्धा विजयी झाले आहेत. याशिवाय भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार दिलीप रे यांनीही अनपेक्षित विजय मिळवला.

ओडिशा विधानसभेत १४७ आमदार आहेत. यात काँग्रेस आणि बीजेडीकडे त्यांच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पुरेसं संख्याबळ होतं. पण बीजेडीच्या ८ आमदारांनी आणि काँग्रेसच्या ३ आमदारांनी पक्षाच्या आदेशाविरोधात जात भाजपने पाठिंबा दिलेल्या दिलीप रे यांना क्रॉस वोटिंग केलं. बीजेडीच्या नवीन पटनायक यांनी भाजपकडून घोडेबाजार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसंच पक्षाचा आदेश डावलणाऱ्या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी केल्याचंही सांगितलं.

हरियाणात २ जागांसाठी चुरशीने मतदान झालं होतं. मात्र मतदानाच्या गोपनियतेचा भंग झाल्याच्या तक्रारीमुळे मध्यरात्री एक वाजेपर्यंत मतमोजणी थांबवण्यात आली होती. रात्री उशिरा नाट्यमय घडामोडीनंतर निकाल लागला. यात भाजप आणि काँग्रेसने अपेक्षितरित्या एक एक जागा जिंकली.


BJP |
इतर बातम्या
Join Whatsapp Group