भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. हिंगोलीच्या राजकारणात एकेकाळी मोठं नाव असलेले माजी खासदार दिवंगत राजीव सातव हे नाव उच्चारलं की विरोधकांच्या माना झुकायच्या. गोड वाणी, सुसंघटित संगठन, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व या जोरावर राजीव सातव यांनी हिंगोलीला काँग्रेसचा अभेद्य किल्ला बनवला. पण कोविडने सातव यांना हिरावून नेलं आणि त्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली.
राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते
दरम्यान , काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरल्याची माहिती आहे.त्या सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. प्रज्ञा सातव यांचा उद्याच (18 डिसेंबर) भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी गटबाजीला कंटाळून निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशात तथ्य नसल्याचे म्हटलं आहे.
डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचं 2021 मध्ये आजारपणामुळे निधन झालं. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत.
काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. प्रज्ञा सातव या पहिल्यांदा 2021 मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या. 2030पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे.