मुंबईहून घराकडे निघाले अन कसारा घाटात मृत्यूने गाठले, काँग्रेस नेत्याचं निधन
मुंबईहून घराकडे निघाले अन कसारा घाटात मृत्यूने गाठले, काँग्रेस नेत्याचं निधन
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती आणि पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी डॉ. सत्येंद्र भुसारी यांचे काल सायंकाळी कसारा रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने चिखली तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 नोव्हेंबर रोजी पक्षाची बैठक संपल्यानंतर डॉ. भुसारी हे मुंबईवरून चिखलीकडे परत येत होते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नाशिकजवळील कसारा घाटात धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ नाशिक येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संबंधित रेल्वे कासारा स्टेशनवर थांबत नसल्याने नेमका अपघात कसा घडला? याचा तपास पोलिस करत आहेत.

डॉ. भुसारी यांनी मराठा  सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्याची वाटचाल सुरू करत समाजसेवेत आपले स्थान निर्माण केले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्य केले. नुकतेच काँग्रेस पक्षाने त्यांची पैठण विधानसभा मतदारसंघ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.

दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेसचे निरीक्षक म्हणून त्यांनी संभाव्य उमेदवारांची बैठक घेतली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ते इसोली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढणार होते. काल सायंकाळी मुंबईवरून परत येत असताना कसारा घाटात ही दुर्घटना घडली. डॉ. सत्येंद्र भुसारी यांच्या अपघाताची माहिती समजताच  माजी आमदार राहुल बोंद्रे मुंबईहून घटनास्थळी रवाना झाले.

उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर यांनीही तत्काळ तेथे पोहोचून परिस्थितीची माहिती घेतली. चिखलीच्या आमदार श्‍वेता महाले-पाटील यांचे पती विद्याधर महाले यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक मदतीच्या सूचना दिल्या.  डॉ. भुसारी यांच्या निधनाने चिखली तालुका तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group