भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी मोदी सरकारने जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार त्यांच्या कुटुंबाकडे स्मारकासाठी जागा देणार आहे. माहितीनुसार सध्या सरकार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाकडून ट्रस्ट स्थापन करण्याची वाट पाहत आहे. ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर सरकारकडून सिंग यांच्या कुटुंबीयांकडे स्मारकासाठी जागा अधिकृतपणे वाटप करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रस्टला सरकारककडून 25 लाख रुपयांची रक्कम देखील देण्यात येणार आहे. ही रक्कम स्मारकाच्या बांधकामावर खर्च करण्यात येणार आहे. स्मारकाच्या जागेसाठी सरकारकडून एक सर्वेक्षण करण्यात आला होता. सरकारने मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकाशेजारची जागा ठरवली आहे.
मनमोहन सिंग स्मारकासाठीची जमीन नगर विकास मंत्रालय आणि सीपीडब्ल्यूडी यांनी संयुक्तपणे ठरवली आहे. या संकुलाखाली अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक देखील आहे.
जानेवारीच्या सुरुवातीला, सीपीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली होती आणि संजय गांधींच्या समाधीजवळ जमीन देण्याची चर्चा झाली होती. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाला काही जागा प्रस्तावित करण्यात आल्याचे वृत्त आहे, त्यापैकी एका जागेवर आता सहमती झाली आहे.
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी अशी मागणी केली होती की, ज्या ठिकाणी मनमोहन सिंग यांचे अंतिम संस्कार होणार त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक बांधण्यात यावे. तर दुसरीकडे स्मारक ज्या ठिकाणी बांधले जाणार आहे त्याच ठिकाणी अंतिम संस्कार करणे शक्य नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते.