कल्याण डोंबिवली महापालिकेमधील पॅनल क्रमांक २९ हा प्रभाग सध्या चांगलाच चर्चेत आहे. या प्रभागांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेतील पहिली लढत शिवसेना विरुद्ध भाजप अशी होत असून आरोप-प्रत्यारोपामुळे ही लढत चर्चेचा विषय ठरली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर मंगळवारी रात्री डोंबिवलीत मोठी राजकीय खळबळ उडाली. प्रभाग क्रमांक २९ मधील भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना अटक केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून प्रभाग क्रमांक २९ मधील सुनील नगर तुकाराम परिसरात भाजप पदाधिकाऱ्याकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना उमेदवाराकडून केला जातोय. अशातच काल (13 जानेवारी) रात्रीच्या सुमारास याच कारणावरून शिवसेना आणि भाजप पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. याच वादात दोन्ही गटातले पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून शिवसेनेचे उमेदवार रवी पाटील आणि नितीन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.
गेल्या रविवारी प्रभाग २९ च्या भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी त्यांना मारहाण केली होती. या हल्ल्यात ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ जणांवर गुन्हे दाखल केले होते. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता प्रचार संपल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोन्ही उमेदवारांना ताब्यात घेतले.
अटकेच्या प्रक्रियेदरम्यान दोघांचीही प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री उशिरा डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला असून कल्याण-डोंबिवलीतील वातावरण चांगलंच तापलं आहे.या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली असून त्यात उमेदवारांच्या मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी तुकाराम नगर आणि रुग्णालय परिसरात जवळपास २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर अटक झाल्याने हे दोन्ही उमेदवार स्वतःचे मतदान करू शकणार का? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.सध्या डोंबिवलीत राजकीय वातावरण कमालीचे तापले असून मतदानाच्या दिवशी याचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.