राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून महापाैर पदावरून रस्सीखेच सुरू आहे. मुंबईसह कल्याण डोबिंवली महापालिकेत महायुतीची सत्ता आली. कल्याण डोबिंवली महापालिकेत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत निवडणुका लढल्या होत्या. कल्याण डोबिंवली महापालिकेत शिवसेना शिंदे गट मोठा पक्ष राहिला आहे. आता महापाैर नक्की कोणाचा होणार यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेचं असलेल्या कल्याण-डोंबिवलीत मोठी राजकी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे, ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे स्वत: शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 53 नगरसेवक घेऊन आम्ही गट स्थापनेसाठी कोकण भवन येथे आलो होतो. इथे शिवसेनेला मनसेचे जे पाच नगरसेवक आहेत, त्यांनी पाठिंबा जाहीर केलाय. विकासाच्या मुद्द्यावरून विकासामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मनसेने आम्हाला समर्थन दिलंय. भाजपाला देखील आम्ही वेगळं सोडलेलं नाही, महापौर कोण होईल याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील, अशी माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली. ठाकरेंचे नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, याबाबत माहिती नाही, ते कुठेतरी फिरायला गेले असतील. ठाकरेंच्या उर्वरित नगरसेवकांनी देखील पाठिंबा दिल्यास हरकत नाही. आम्ही जो विकास करतोय ते पाहून कोणीही पाठिंबा देत असेल तर काय हरकत आहे, असेही श्रीकांत शिंदेंनी म्हटले.