२०२६ हे वर्ष राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार असून, या वर्षात देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यसभेतील सदस्यांची निवृत्ती आणि नव्या निवडणुकांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यंदा राज्यसभेतील एकूण ७१ खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापैकी मार्च महिन्यात १, एप्रिलमध्ये ३७, जूनमध्ये २२ तर नोव्हेंबरमध्ये ११ खासदार निवृत्त होणार आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील एकूण सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वात मोठे नाव आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार धैर्यशील मोहन पाटील यांचाही समावेश आहे.
तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार डॉ. फौजिया खान हे सर्वजण एकाच दिवशी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून संसदेत कोणते नवे चेहरे प्रवेश करणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.