राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. काळ प्रचाराच्या तोफा थंडावल्या. महापालिका निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले आहेत. अशातच राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने एक नवे मशीन आणले आहे. या मशीनला विविध पक्षांकडून विरोध केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ईव्हीएम (EVM) सोबत मत मोजणीसाठी नवीन मशीन प्रिंटिंग अँड ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट्स’ (PADU – पाडू) चा वापर करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी या मशीन वापरावर संशय व्यक्त केला.
‘पाडू’ मशीन काय?
EVM ला हे नवीन पाडू मशीन जोडल्या जाणार आहे. पाडू मशीन म्हणजे Deploy Printing Auxiliary Display Unit-PADU. पाडू मशीन एक अतिरिक्त छोटं यंत्र आहे. जे ईव्हीएम सोबत जोडल्या जाणार आहे. कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट या यंत्रणा सोबत जोडण्याचे आदेश आहेत. कंट्रोल युनिटचा डिस्प्ले जर अचानक बंद झाला तर अशावेळी पाडू मशीन उपयोगात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रिती मेनन यांनी, ‘हा ‘मत चोरी’चा आणखी एक प्रयत्न आहे. कालच्या सर्वपक्षीय बैठकीत आम्हाला सांगण्यात आले की, ईव्हीएम (EVM) च्या डिस्प्ले युनिटमध्ये बिघाड झाल्यास एक नवीन मशीन – ‘प्रिंटिंग अँड ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट्स’ (PADU – पाडू) वापरली जाईल आणि ही मशीन निकाल प्रदर्शित करेल. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, ईव्हीएम – कंट्रोल युनिट (CUs) आणि बॅलट युनिट (BUs) साठी राज्य निवडणूक आयोगाने अनिवार्य केलेले कठोर रँडमायझेशन आणि तपासणी प्रोटोकॉल आहेत. ज्यात पक्षांच्या प्रतिनिधींचाही सहभाग असतो. पण या ‘पाडू’ मशीनसाठी असा कोणताही प्रोटोकॉल नाही. मग आम्ही हे कसे सुनिश्चित करू शकतो की, या ‘पाडू’ मशीन खरे निकाल दाखवत आहेत आणि त्यांच्याशी छेडछाड केली जात नाही?’ असे म्हटले आहे.