राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून तीन दिवस शासकीय दु:खवटा पाळण्यात आला आहे. अजित पवारांच्या अकाली निधनाचा गावखेड्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही धक्का बसलाय. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वच स्तरातील, क्षेत्रातील मान्यवरांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. तर, राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवरही त्याचा परिणाम झाला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे. ना प्रचार सभा ना रोड शो केले जातील. फक्त मतदारांना पत्रके वाटून प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत, उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असे स्पष्ट आदेश देण्यात आली. हेच नाही तर निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढली जाणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यामध्येच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही तोंडावर आहेत.
तर , दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन महाआघाडीचा नवा प्रयोग झालेल्या बार्शी तालुक्यात अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय वातावरण भावुक झालं आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि भाजप नेते राजेंद्र राऊत या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत, साध्या पद्धतीने प्रचार करावा, कुठेही वाद्य किंवा फटाकेबाजी करू नये, केवळ लोकांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करावा अशी विनंती केली आहे. निवडणूक प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बार्शीत येणार होते. मात्र, आता या तीन नेत्यांपैकी कुणीही बार्शीत प्रचाराला येणार नसल्याचे समजते.