अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी बारामती येथे येत असताना 28 जानेवारीला त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता. विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. यानंतर विमानाचा प्रचंड स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर मोठा आघात झाला होता.
अजित पवार यांच्या निधनाला आता पाच दिवस उलटून गेले आहेत. या काळात राज्याच्या राजकारणात वेगवान राजकीय घडामोडी घडल्यामुळे पवार कुटुंबीयांना दु:ख बाजूला सारुन लगेच मैदानात उतरावे लागले होते. या दु:खातून सावरत असतानाच आता अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे.
जय पवार यांनी आपल्या व्हॉटसअॅप स्टेटसला वडिलांसोबतचे दोन फोटो ठेवले आहेत. यासोबत जय पवार यांनी काही मजकूरही लिहला आहे. यामध्ये म्हटले आहे की, "तुमची खूप आठवण येतेय. डॅड काश वेळ थांबली असती, मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. मिसिंग यू अ लॉट डॅड!", असे जय पवार यांनी म्हटले. जय पवार यांच्या या स्टेटसचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. अजित पवार यांच्याकडील उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांच्या मंत्रिपदीही सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली.