राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी २८ जानेवारी रोजी सकाळी अजित पवार हे मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला जात असताना सकाळी 9 वाजेच्या दरम्यान त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला.
आता यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ९ फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. मात्र यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळेच यावर्षी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.
कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनी ही पुष्पगुच्छ आणू नयेत. तसेच शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाहीये. व्यक्तिशः मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी कधीच भरून निघणार नाही.पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. अशा या दु:खद परिस्थितिमध्ये वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य आपण जपू असे आवाहन शिंदे यांनी केले.