राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. यानंतर २९ जानेवारीला अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय बारामतीत दाखल झाला होता.
आलेल्या हजारोंच्या डोळ्यात अश्रू होते, मनात अतीव दु:खाच्या वेदना होत्या. मात्र, या दु:खद प्रसंगातही काहींना संधी साधावी वाटली. अंत्यसंस्कारावेळीच्या गर्दीचा गैरफायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. गर्दीचा गैरफायदा घेत गर्दीत तब्बल १५ नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरट्यांनी लंपास केल्या.
अत्यविधीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात सुमारे ८ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात असतानाही चोरट्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर डल्ला मारल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, गर्दीतून काही संशयितांना नागरिकांनी सतर्कता दाखवत रंगेहाथ पकडले आणि त्यांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.या धक्कादायक प्रकारानंतर पीडित नागरिकांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान राजकुमार बाबुराव आठवले (रा.तलवाडा ता.गेवराई, जि. बीड), मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस (रा. गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ), एजाज भगु मीरावले (रा.गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ), मोहम्मद सादिक मोहम्मद गफार (रा. मोतीनगर, डिग्रज, यवतमाळ), बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे (रा. इंदिरानगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर सध्या रा. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे), तुषार कैलास मासाळ (रा.कोरडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), नितीन अंकुश गायकवाड (रा.शिक्षक कॉलनी, ता. बीड,जि.बीड) आदी आरोपींना अटक आली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी अधिक पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.