बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सुरू असलेल्या चौकशीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक नेत्यांनी देखील या अपघातांवर शंका उपस्थित केल्या आहेत.
अजित पवारांसोबत केबिन क्रू म्हणून प्रवास करणाऱ्या आणि विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी मालीच्या वडिलांनी देखील घातपाताचा संशय उपस्थित केला. राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकतं असं म्हणत त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली. तसेच या प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर अनेकजण अडचणीत येतील असा दावाही केला.
पिंकी मालीचे वडील शिवकुमार माली एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते, यावेळी त्यांनी म्हटले की "रोहित पवारांनी जी शंका व्यक्त केली ते पाहता हा घातपात असू शकतो असा संशय आम्हाला आहे. रोहित पवार आणि अमोल मिटकरींनी व्यक्त केलेल्या संशयावर तपास झाला पाहिजे. या अपघातात आम्हीही मुलगी गमावली आहे, त्यामुळे या अपघाताचं नेमकं कारण आम्हाला समजलं पाहिजे. जी व्हीएसआर कंपनी आहे, त्याचे अधिकारी आम्हाला याबद्दल काहीही माहिती देत नाहीत." पिकी माली ही वरळीतील बीडीडी चाळ नं. 29 येथील रहिवाशी शिवकुमार माली यांची कन्या होती. व्हीएसआर कंपनीच्या विमानात ती फ्लाईट अटेंडन्ट म्हणून काम करत होती.
दरम्यान आज दिल्लीत रोहित पवार यांनी नवीन खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या मृतदेहाबद्दल डॉक्टरांनी काय माहिती दिली होती, याबाबत रोहित पवारांनी खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा नवीन खुलासा केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही बाब आपण सांगितली नव्हती असंही ते म्हणाले. ज्यावेळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, त्यावेळी त्यांचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. त्यामध्ये अजित पवारांचा मृतदेह मोठ्या प्रमाणात फुगल्याचा दावा केला जात होता. तो मृतदेह अजित पवारांचा आहे का? याबाबतही संभ्रम होता, त्यानंतर आता फुगलेल्या मृतदेहाबाबत रोहित पावरांनी माहिती देताना म्हटलं की, "डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादांची बॉडी खूप सुजलेली होती. मी जेव्हा त्यांना विचारलं भाजल्यानंतर शरीर सुजतं का? त्यावर त्यांनी सांगितलं की, हो शरीर सुजते. अजित दादांची बॉडी असामान्यपणे खूप जास्त सुजलेली होती. ती का इतकी सुजलेली होती, ते पाहणंही महत्त्वाचं आहे, अशी नवी माहिती रोहित पवारांनी दिली. यामुळे आता अजित पवारांसोबत नेमकं काय घडलं? याचं गूढ वाढतच चाललं असल्याचं चित्र आहे.