राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रला हादरा बसलेला आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनेक नेते व्यक्त करत आहे त्यात रोहित पवार आघाडीवर आहे. रोहित पवार यांनी आतापर्यंत चार पत्रकार परिषद घेऊन याविषयीचे काही पुरावे सादर केले. त्यांनी अपघाताप्रकरणी सादरीकरण करत काही प्रश्नही उपस्थित केले. तर याप्रकरणी तपास यंत्रणांच्या संथ तपासावर ताशेरेही ओढले.
विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार हे पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेतून सर्व महत्त्वाचे पुरावे लोकांसमोर आणणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. विमान अपघाता संदर्भात एफआयआर दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हा दाखल होणे आवश्यक असते असे ते म्हणाले. तर अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात राज्यातील विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा होऊ दिली जात नसल्याचा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल व्हायला हवा पण तो झाला नाही. जय पवार हे सुद्धा ट्विट करतात, त्यामुळे ते पत्रकार परिषद घेतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. आम्ही दादांच्या मृत्यूचं कधीच राजकारण केलं नाही, एवढा मोठा नेता आपल्यातून कायमचा हरपून जातो , पण ना केंद्र सरकारला ना राज्य सरकारला याबाबत तपास योग्य पद्धतीने व्हावा असं वाटतं. त्यामुळे राजकारण आम्ही करतोय का ते करतात याचा विचार त्यांनी करावा असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.