राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन १५ दिवस उलटले आहेत. हा विमान अपघात होता की घातपात यावरून सध्या संशयाचं रान उठलं आहे. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले असून याप्रकरणाची सखोल, कसून, निष्पक्ष चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे. १५ दिवस होऊनही अजून काहीही निष्पन्न झालेलं नाही. यावरून प्रश्न विचारण्यात आला असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास होणार नाही, तपासातून काहीही निष्कर्ष निघणार नाही असं संजय राऊत स्पष्टच म्हणाले. रोहित पवार यांनी जे प्रेझेंटेशन दिलं , त्यातल्या कोणत्या मुद्यावर झाला किंवा झाला नाही, हे शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाही. अजित पवार हे ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते, त्या कंपनीतही एक अदृश्य हात आहे. त्या कंपनीमधली बेनामी इन्व्हेस्टमेंट, बेनामी मालक कोण याचा आधी तपास व्हायला पाहिजे, असे राऊत म्हणाले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पूर्णपणे तपास होणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अमित शाह यांच्या हातात गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याही हातात राहिलेली नाहीत, ती अमित शाह यांच्या हातात गेली आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार नाही. त्याऐवजी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच भाजपमध्ये विलीन होईल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रफुल पटेल ज्याअर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये, असे म्हणत आहेत, त्याअर्थी ही अमित शाह यांची इच्छा आहे. या सगळ्यात भाजपचा अदृश्य हात आहे. सगळं काही अमित शाह यांच्या इच्छेनुसारच होईल. प्रफुल पटेल बोलत आहेत म्हणजे अमित शाहच बोलत आहेत. भविष्यात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपमध्येच विलीन होईल, राष्ट्रवादीचे सगळे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूविषयी पवार कुटुंबातून हल्ले होत आहेत. रोहित पवार यांनी पुरावे समोर आणले आहेत. त्यावर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही पुराव्याच्याआधारेच प्रत्युत्तर द्यावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.