राहुरी पोटनिवडणुकीतील 'सस्पेन्स' अखेर संपला , प्राजक्त तनपुरेंची पोटनिवडणुकीतून माघार, आता...
राहुरी पोटनिवडणुकीतील 'सस्पेन्स' अखेर संपला , प्राजक्त तनपुरेंची पोटनिवडणुकीतून माघार, आता...
img
वैष्णवी सांगळे
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र राहुरी पोटनिवडणुकीत निर्माण झालेला 'सस्पेन्स' अखेर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, भाजप नेत्यांच्या विनंतीवरून आणि मतदारसंघाच्या विकासाच्या आश्वासनानंतर त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले

प्राजक्त तनपुरे यांच्याकडे राजकारणाचा दीर्घ अनुभव असून त्यांनी मविआ सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते. त्यामुळे भाजपचे पाठबळ असूनही अक्षय कर्डिले  यांना राहुरीची पोटनिवडणूक जड जाण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपने सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला डाव टाकला. सोमवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन अनुभवी नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीला पोहोचले. यानंतर या तिघांमध्ये बराच काळ बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर प्राजक्त तनपुरे यांचा राहुरीची पोटनिवडणूक लढवण्याचा विचार बदलल्याचे दिसले. 

दरम्यान, आगामी काळात प्राजक्त तनपुरे राहुरी मतदारसंघात सांगतील त्या विकासकामांसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार 100 टक्के मदत करेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी फोनवरून तनपुरे यांना दिले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण चालवणाऱ्या मोठ्या नेत्याने शब्द दिल्याने प्राजक्त तनपुरे राहुरी पोटनिवडणुकीत जिंकण्याची चांगली शक्यता असतानाही माघार घ्यायला तयार झाल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे. 

दुपारी तीन वाजण्यापूर्वी शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्राजक्त तनपुरे ऐनवेळी माघार घेऊ शकतात, याची कल्पना असल्याने शरद पवार गटाच्या मुंबई कार्यालयातून राहुरीत प्राजक्त तनपुरे आणि गोविंद मोकाटे असे दोन एबी फॉर्म पाठवण्यात आले होते. मात्र, दुपारी अडीचच्या सुमारास गोविंद मोकाटे हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले. तेव्हाच प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group