राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. १५ जानेवारीला मनपा निवडणुकीसाठी मतदान तर १६ जानेवारीला या मतदानाचा निकाल आहे. दरम्यान राज्यात विविध ठिकाणी पक्षांमध्ये बाचाबाची , हाणामारी होत असल्याचं पहायला मिळतंय. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला असतानाच, डोंबिवलीत प्रभाग क्रमांक २९ मध्ये शिवसेना-भाजपामध्ये जोरदार राडा झालाय.
शाब्दिक चकमकीनंतर हा वाद थेट थेट खुनी हल्ल्यापर्यंत पोहोचला. भाजपच्या एका नेत्यावर भररस्त्यात कोयत्याने वार करण्यात आले आहेत , त्यामुळे प्रभागातील वातावरण चांगलच तापलं असून या हल्ल्यामुळे एकप्रकारे निवडणुकीला गालबोट लागलं आहे.
कल्याण डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये सोमवारी भाजपच्या पत्रकांमधून पैसे वाटप केल्याचा आरोप या प्रभागात झाला होता. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री १० वाजेनंतर भाजपचे कार्यकर्ते मीटिंग घेत असल्याची माहिती शिवसेनेच्या ( शिंदे गट ) कार्यकर्त्यांना मिळाली. "रात्री १० नंतर आचारसंहिता असताना भाजपची मीटिंग कशी काय सुरू आहे?" असा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते तिथे पोहोचले.
सुरुवातीला दोन्ही गटात शाब्दिक चकमक घडली आणि पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यावर थेट कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात भाजपचे पदाधिकारी ओमनाथ नाटेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच भाजपचे ३ आणि शिवसेनेचे २ कार्यकर्ते देखील जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रभाग क्रमांक २९ हा सर्वात संवेदनशील प्रभाग असल्याचं माहिती असतानाही पोलिसांनी या ठिकाणी पुरेशी खबरदारी का घेतली नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण इथं आधीच पैसे वाटल्याचा आरोप झाल्यानंतर प्रभागातील वातावरण तापलं होतं. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेणं आवश्यक होतं, असं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.