सांगलीत महायुतीचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. निवडणुकीला काही दिवस उरले असताना सांगलीत भाजपाला धक्का बसला आहे. सांगली जिल्ह्यातील महापालिकेच्या निवडणुकीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण या निवडणुकीत संभाजी भिडे गुरूजी यांच्या श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी उतरले आहेत. सांगलीमध्ये संभाजी भिडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या शिवप्रतिष्ठानचे काम करणाऱ्या तरुणांची संख्या बरीच आहे असे असताना आता सांगलीत संभाजी भिडे यांचे धारकरीच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तिथे राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे.
भाजपाकडे उमेदवारी मागूनही फक्त एकच जागा मिळाल्याने आता शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे ठरवले आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भाजपाकडे धारकऱ्यांसाठी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांना एकच जागा दिल्याने धारकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. हिंदुत्त्व, लव्ह जिहाद, गोरक्षा यांसह अनेक मुद्द्यांवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी काम करतात. परंतु भाजपाने समाधानकारक जागा दिल्या नाहीत. त्यामुळेच आता धारकरी या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
आज (29 डिसेंबर) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी राहुल बोळाज यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. पक्षाने आमचा विचार केला नसला तरी आम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहोत, असे यावेळी राहुल बोळाज आणि धारकरी सुरेंद्र बोळाज यांनी सांगितले आहे.