नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) नाशिक महानगर पालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रात्री साडे आठ वाजेपर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते. त्यानंतर एकूण ५६.६७ टक्के मतदान झाले आहे. गेल्यावेळेस पेक्षा पाच टक्क्यांनी मतदानाचा टक्का घसरला आहे.
२०१७ टक्के झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत ६१.६० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आठ वर्षानंतर मतदान होत असल्याने अधिकाधिक टक्केवारी वाढण्याची शक्यता होती. परंतु ती घटली आहे. नाशिक शहरात सिडको भागात पैसे वाटपाच्या चर्चांमुळे सावता नगर भागात गर्दी झाली होती.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला, तर सायंकाळी काठेगल्ली भागातील एका शाळेत बोगस मतदानाच्या तक्रारीवरून भाजप आ. देवयानी फरांदे आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आ. वसंत गिते यांच्या समर्थकांत वाद झाले. किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. आज सकाळी १० वाजता नाशिक शहरात विविध दहा ठिकाणी मतमोजणी सुरू असून सर्व निकाल दुपारी चार वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे.
नाशिक महानगरपालिकेत १२२ सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीचे काही तास मतदान शांततेत पार पडले.
पहिल्या दोन तासांत नाशिक शहरात ६.६ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा वेग काहीसा वाढला, मात्र अपेक्षित गती मतदान प्रक्रियेला मिळाली नाही. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नाशिकमध्ये मतदान ३९. ६४ तर टक्क्यांपर्यंत पोहोचले. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सायंकाळी साडेपाच वाजता मतदान प्रक्रिया संपेपर्यंत नाशिकमध्ये मतदानाचा टक्का सुमारे ५७ टक्के, तर मालेगावमध्ये सुमारे ५५ टक्के राहिला. नाशिकमध्ये सर्वाधिक मतदान प्रभाग 22 मध्ये 66.85 टक्के तर सर्वात कमी मतदान प्रभाग 21 मध्ये झाले. प्रभाग 21 मध्ये 49.08 टक्के इतके मतदान झाले.
दरम्यान, सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर सिडको प्रभाग क्रमांक २९ मधील दक्षिणमुखी मारुती मंदिराशेजारील मतदान केंद्रावर मतदान यंत्रातील भाजप पुरस्कृत उमेदवाराचे बटण कार्यरत नसल्याची तक्रार करण्यात आली. तक्रारीची दखल घेत प्रशासनाने तातडीने नवीन मतदान यंत्र बसवले, त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली.
नाशिक शहरातील अनेक प्रभागांमध्ये मतदानादरम्यान इच्छुक उमेदवारांच्या कार्यालयात पैसे व भेटवस्तूंच्या वाटपाच्या चर्चा रंगल्या होत्या. काही ठिकाणी मोठी गर्दीही पाहायला मिळाली. मात्र या प्रकारांवर प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.