तेजस्विनी बाटवालचे लागोपाठ तिसरे अर्धशतक
तेजस्विनी बाटवालचे लागोपाठ तिसरे अर्धशतक
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी)- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या  तेजस्विनी बाटवालने , बीसीसीआयच्या वरिष्ठ महिला एक दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना आसामवरील विजयात दमदार ७० धावा करून लागोपाठ तिसरे अर्धशतक झळकवून, सातत्यपूर्ण फलंदाजीने  पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विजयात मोठा वाटा उचलला. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित वरिष्ठ महिला एक दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत राजकोट येथे ६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र संघाचे साखळी सामने होत आहेत.  

आसाम संघाने प्रथम फलंदाजी करत ४५ षटकांत ७ बाद २०१ धावा केल्या. सलामीच्या खुशी शर्मा ८१ व अमोन्तिका मुंडाच्या ५२ धावांनंतर कोणीच विशेष चमक दाखवू शकले नाही. मुक्ता मगरेने २ बळी घेतले. महाराष्ट्राने विजयासाठीच्या २०२ धावा सलामीला खेळणाऱ्या तेजस्विनी बाटवालच्या ९  चौकरांसह ७० तसेच गौतमी नाईक व कर्णधार अनुजा पाटील यांच्या अर्धशतकांच्या जोरावर केवळ ३०.१ षटकांत ८ गडी राखून सहज पार केल्या. यासह महाराष्ट्राने पुदुचेरी व उत्तर प्रदेश पाठोपाठ आसामवरील मोठ्या विजयाने आपल्या सलग तिसऱ्या विजयाची देखील  नोंद केली.

राजकोट  येथे वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील,  महाराष्ट्राचे बाकी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत - १२  फेब्रुवारी - वडोदरा, १४ फेब्रुवारी - मध्य प्रदेश , १६  फेब्रुवारी -कर्नाटक व १८  फेब्रुवारी - ओडिशा .

तेजस्विनी बाटवालच्या फलंदाजीतील या सातत्यपूर्ण कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी, तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून उर्वरित स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group