मध्यप्रदेशातील मजूर कुटुंब पंढरपूरहून आपल्या राज्याकडे परतत असताना, येवला तालुक्यातील सावरगाव शिवारात एका गरोदर मातेला प्रसुती कळा सुरू झाल्या. अशा आणीबाणीच्या प्रसंगात सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमने देवदूतासारखे धावून जात रस्त्यावरच यशस्वी प्रसुती केली. आरोग्य विभागाच्या या तत्परतेमुळे बाळ आणि माता दोघांचेही प्राण वाचले असून, 'सक्षम आरोग्य सेवेचा' एक उत्तम नमुना यानिमित्ताने पाहायला मिळाला.
मध्यप्रदेशातील मजूर कुटुंब गाडीने प्रवास करत असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील सावरगाव जवळ आले. यावेळी गाडीतील एका महिलेला तीव्र प्रसुती कळा सुरू झाल्या. घाबरलेल्या नातेवाईकांनी तातडीने गाडी थांबवून स्थानिक नागरिकांकडे मदतीची विचारणा केली. गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखून ही माहिती सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल काकड यांना दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून डॉ. अमोल काकड यांनी क्षणाचाही विलंब न लावता परिचारिका श्रीमती दर्शना गवळी आणि रुग्णवाहिका चालक सागर निकम यांना सोबत घेतले. प्रसुतीसाठी लागणारे आवश्यक साहित्य घेऊन ही टीम तातडीने महामार्गावर पोहोचली. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दवाखान्यात नेणे धोक्याचे ठरू शकले असते, ही बाब लक्षात घेऊन डॉक्टरांनी रस्त्यावरच उपचार सुरू केले आणि यशस्वी प्रसुती केली.
आरोग्य विभागाकडून कौतुकाचा वर्षाव, प्रसुतीनंतर माता आणि नवजात बालकाला पुढील उपचारांसाठी सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. अचानक उद्भवलेल्या या संकटात नाशिक जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या या तत्पर सेवेबद्दल मजूर कुटुंब आणि नातेवाईकांनी डोळ्यात पाणी आणून आभार मानले.
या विशेष कामगिरीबद्दल जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, डॉ. दीपक लोणे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तारू यांनी डॉ. अमोल काकड व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.