नाशिक : इंदिरानगर मोक्का प्रकरणात चार आरोपींना दुहेरी जन्मठेप
नाशिक : इंदिरानगर मोक्का प्रकरणात चार आरोपींना दुहेरी जन्मठेप
img
Prashant Nirantar
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- इंदिरानगर पोलीस ठाण्यातील 2019 मधील खून व दरोड्याच्या मोक्का प्रकरणात विशेष न्यायालयाने चार आरोपींना दुहेरी जन्मठेप व एकूण 34 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 1 चे न्यायाधीश अभय के. लाहोटी यांनी सोमवारी (दि. 6) हा निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 1, 2, 3 व 5 यांना भारतीय दंड विधान आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये दोषी ठरविण्यात आले.

हा गुन्हा दि. 8 जानेवारी 2019 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास इंदिरानगर येथील गणाधिराज अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडला होता. अविनाश महादेव शिंदे (वय 34) यांची चाकूने भोसकून हत्या करून सुमारे सहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग आरोपींनी लंपास केली होती. ही घटना त्यांच्या लहान मुलासमोर घडली होती.

या प्रकरणात आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून शिंदे यांच्यावर हल्ला केला. आरोपींपैकी एकाने धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला, तर इतरांनी रोकड लुटून घटनास्थळावरून पलायन केले होते. न्यायालयाने आरोपी क्रमांक 1, 2, 3 व 5 यांना खून व कट रचल्याप्रकरणी जन्मठेप व दंडाची, तसेच दरोड्याप्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपी क्रमांक 1 व 3 यांना मोक्का कायद्यान्वयेही स्वतंत्रपणे जन्मठेप व दीर्घ मुदतीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. दंड न भरल्यास अतिरिक्त सक्तमजुरीची तरतूद करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून दंडाच्या रकमेतून पाच लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात एकूण 43 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य, भौतिक व इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्यात आला. विशेषतः मृताच्या लहान मुलाची साक्ष व वैज्ञानिक प्रयोगशाळेचे अहवाल महत्त्वाचे ठरले.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त एम. यू. ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. एस. न्याहळदे यांनी केला होता. त्यांनी सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त विशेष सरकारी अभियोक्ता डॉ. सुधीर कोतवाल, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रेश्मा जाधव व जगदीश सोनवणे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या प्रकरणात उत्कृष्ट तपास व पाठपुरावा केल्याबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group