नाशिक : पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने मनपाची धडक मोहीम
नाशिक : पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने मनपाची धडक मोहीम
img
वैष्णवी सांगळे
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने विभागीय अधिकारी यांचे अधिपत्याखाली दि.१३ एप्रिल २०२६ पासून धडक मोहीम हाती घेतली जाणार असून मोहिमेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई मनपाच्या वतीने करण्यात येणार आहे. 

नाशिक महानगरपालिकेमार्फत नाशिक शहरात पाणी पुरवठा करण्यात येतो,काही भागात असे निदर्शनास आले आहे की, काही भागात काही कनेक्शनधारकांनी नळाला तोट्या बसविल्या नसल्याने पाण्याचा अपव्यय होतो. तसेच काही ठिकाणी कनेक्शनधारकांनी पाण्याच्या नळ जोडणीच्या पाईपलाच थेट विद्युत मोटारी लावल्याने त्या ठिकाणच्या इतर कनेक्शनधारकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. यासाठी महानगरपालिके तर्फे  मा.आयुक्त सो यांचेकडील जा.क्र./मनपा/पापुवि/१८/२०१७ दि.०७/०४/२०१७ रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये दिनांक १३/०४/२०२६ पासुन विशेष मोहीम विभागीय अधिकारी यांचे अधिपत्याखाली राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या तपासणीत 

१) ज्या ठिकाणी नळाला तोटी नसेल तेथे तोटी बसविण्यात येईल व कनेक्शन धारकांकडुन र.रु. १००/- दंड बसून करणेत येईल.

२) नळ जोडणीत जलमापक नसल्यास/नादुरुस्त/बंद आढळल्यास नियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करणेत येऊन पाणी बिल आकारणी करणेत येईल.

३)  विद्युत मोटार नळ जोडणीस जोडलेली आढळल्यास मोटार कायमस्वरुपी जप्त करुन र.रु. ५००/- दंड आकारण्यात येईल.

४) पाण्याचा अपव्यय केल्यास/पाणी वाया घालविल्यास र.रु. १००/- दंड आकारण्याची कारवाई करणेत येणार आहे.

मोहिमेसाठी मनुष्यबळ 
ही मोहीम राबविण्यासाठी पाणी पुरवठा विभागामार्फत संबंधीत विभागाचे उपअभियंता यांनी त्यांचे अखत्यारीतील एक कनिष्ठ अभियंता/मिस्त्री/मुकादम यांचे प्रभाग निहाय नेमणुक करण्यात येणार आहे. तसेच १ फिटर व ५ प्लंबरची नेमणुक नळांना तोटया बसवण्या करीता करण्यात येणार आहे. नळ कनेक्शन धारकावर दंडात्मक कार्यवाहीसाठी मिटर रीडर व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची नेमणुक करण्यात येणार आहे.   

मोहीमेमध्ये कार्यरत कर्मचारी यांना पोलिस कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागास दोन पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्युत मोटारी जप्तीसाठी विद्युत विभागामार्फत एक वायरमनची/इलेक्ट्रीशनची व्यवस्था करण्यात येणार आहे.  
 
तरी नाशिक शहरातील नागरीकांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मोहीमेस सहकार्य करावे अशी विनंती पालिकेनी केली आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group