नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- खोटे लग्न लावून देत दोन तरुणांकडून पाच लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आठ महिलांसह एका पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बलवंत साहेबराव पाटील (रा. वायपूर, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की देवीदास जिजाबराव पाटील व नीलेश सुकदेव पाटील हे तरुण लग्नासाठी वधूच्या शोधात होते. त्यावेळी आरोपी गीता नरेश कोसारे, संगीता भिवाजी मोरे, जयश्री गिरीश मोहिते, पुष्पा राकेश रामटेके, जयश्री संजय शिंगाडे, प्राची सुकदेव भालेराव, नम्रता सुकदेव भालेराव, सोनाली अशोक वाकडे या महिलांसह खंडू सोनवणे या इसमाने संगनमत करून देवीदास पाटील व नीलेश पाटील यांना भेटून लग्न करून देण्याचे आमिष दाखविले.
त्यानंतर या दोघा तरुणांचे उंटवाडी येथील क्रांतीनगर झोपडपट्टी व नाशिक शहर परिसरात बनावट लग्न करून दिले. हे लग्न लावून देण्यासाठी आरोपी आठ महिला व एका पुरुषाने त्यांच्याकडून पाच लाख रुपये रोख व फोन पेद्वारे 28 हजार रुपये असे एकूण 5 लाख 28 हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर हे लग्न बनावट असल्याची बाब दोघा तरुणांच्या लक्षात आली.
हा प्रकार डिसेंबर 2025 ते 30 मार्च 2026 या कालावधीत क्रांतीनगर झोपडपट्टी व नाशिक परिसरात घडला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गाढवे करीत आहेत.