Nashik : 3 लाखांची लाच घेताना जि. प. चा उपविभागीय अभियंता एसीबीच्या जाळ्यात
Nashik : 3 लाखांची लाच घेताना जि. प. चा उपविभागीय अभियंता एसीबीच्या जाळ्यात
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील रस्ता कामाच्या बिलासाठी 5.67 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत उपविभागीय अभियंत्याला 3 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली, तर दुसरा आरोपी फरारी झाला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटने मोठी कारवाई करीत जिल्हा परिषद बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. या प्रकरणात उपविभागीय अभियंता विठ्ठल बालाजी पठाडे (वय 56) यांना तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर शाखा अभियंता कृष्णकांत जिभाऊ देवरे (वय 28) हे फरार झाले आहेत.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फर्ममार्फत चांदवड तालुक्यातील सुमारे 72.89 लाख रुपयांच्या रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आणि पूर्वीच्या बिलाच्या मोबदल्यात ‘बक्षीस’ म्हणून अधिकार्‍यांनी एकूण 5 लाख 67 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामध्ये पठाडे यांनी तीन लाख रुपये, तर देवरे यांनी 2.67 लाख रुपये मागितले होते.

नाशिककरांनो पाणी जपूनच वापरा ! नाशिक शहरातील पाणी पुरवठा 'या' दोन्ही दिवशी बंद राहणार

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत 30 मार्च रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला. जिल्हा परिषद कार्यालयात पठाडे यांनी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरारी आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group