दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावात सशस्त्र दरोड्यात तिघे गंभीर जखमी
दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावात सशस्त्र दरोड्यात तिघे गंभीर जखमी
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावात काल ( दि.23) पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास मनोहर धात्रक यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून कुटुंबातील व्यक्तींना गंभीर मारहाण करुन सोन्याच्या दागिन्यांसह रोकड घेऊन दरोडेखोर फरार झाले आहेत.



मनोहर धात्रक यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी जवळच वसंत धात्रक आणि अशोक बोडके यांच्या घरांवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असता तेथील शेतकरी जागे झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढत मनोहर धात्रक यांच्या घरावर दरोडा टाकला. धात्रक यांच्या घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाची आतील कडी जोराने तोडून घराच्या आत प्रवेश करुन ताराबाई धात्रक, सुरेश धात्रक, मनोहर धात्रक यांना हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात सुरेश धात्रक यांच्या डोक्यात काहीतरी हत्याराने मारून त्यांना गंभीर जखमी केले. तर मनोहर धात्रक यांच्या डोळ्याला आणि ताराबाई धात्रक यांच्याही डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत केली. 

त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी सत्तर हजार रुपयांचे दोन सोन्याच्या मणी असलेल्या पोती प्रत्येकी अंदाजे 5 ग्रॅम, दहा हजार रुपयांचे कानातील सोन्याचे कुडके अंदाजे एक ग्रॅम यासह अडीच ते तीन लाखांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती समजताच अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज खुळे यांच्यासह हवालदार विश्‍वनाथ काकड आदी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत भेट दिली. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धात्रक कुटुंबीय पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असताना दरोडा पडल्याची घटना घडली. घरात तीन मोठे तर सुरेश धात्रक यांचा एक दोन वर्षाचा मुलगा असे चार जण झोपलेले होते. पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजा चोरट्यांनी लाथ मारून आतील कडी तोडून दरवाजा उघडला. दोन रूममध्ये हे कुटुंब गाढ झोपेत होते. एका रूममध्ये सुरेश आणि त्याचा मुलगा होता. तो दोन वर्षाचा मुलगा ब्लँकेट घेऊन खाली झोपला असल्याने तो वाचला तर पलंगावर सुरेश धात्रक झोपले असल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यावर काहीतरी हत्याराने वार केल्याने ते तसेच पडून राहिले. 

धात्रक कुटुंबातील जखमींना नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून ताराबाई धात्रक आणि मनोहर धात्रक यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सुरेश धात्रक यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group