नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- शहरातील घरफोडीच्या वाढत्या घटनांना पार्श्वभूमीवर नाशिकरोड युनिटच्या गुन्हे शाखेने मोठी कामगिरी फत्ते केली आहे. उपनगरसह नाशिकरोड, इंदिरानगर आणि देवळाली कॅम्प परिसरात धुमाकूळ घालणार्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 10 लाख 60 हजार रुपये किमतीची 100 ग्रॅम सोन्याची लगड आणि 900 ग्रॅम चांदी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, तब्बल 7 गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारी 2026 रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभा आशिष रेसिडेन्सी (के.जे. मेहता रोड) येथे घरफोडी झाली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेचे नाशिकरोड युनिट समांतर तपास करत होते. तपासादरम्यान पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर आणि मंगेश जगझाप यांना गोपनीय माहिती मिळाली की, चव्हाण मळा आणि अरिंगळे मळा येथील विक्रम आणि करण नावाच्या तरुणांनी हा गुन्हा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद्र गांगुर्डे आणि दिलीप भोई यांनी संशयितांची ओळख पटवली. 20 मार्च रोजी हे दोघेही नवले ब्रिज परिसरात चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची पक्की खबर मिळताच, पथकाने साध्या वेशात सापळा रचला. पोलिसांनी करण काळूसिंग जुनी (वय 23, रा. अरिंगळे मळा) आणि विक्रम तानाजी पऊळ (34, रा. चव्हाण मळा) या दोघांना ताब्यात घेतले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. या संशयितांनी पोलिसी खाक्या दाखवताच नाशिकरोड, इंदिरानगर, देवळाली कॅम्प आणि उपनगर हद्दीत 7 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड युनिटचे प्रभारी अधिकारी संदीप पवार, प्रेमचंद गांगुर्डे, दिलीप भोई, विजयकुमार सूर्यवंशी, अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, भरत राऊत, राजेश राठोड, गणेश भागवत आणि मंगला जगताप यांनी केली आहे.