नाशिक सिन्नरमधील मिरगाव येथील तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला महिलेचं लैंगिक शोषण, अत्याचाराच्या गंभीर आरोपावरून अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात त्याच्या अटकेनंतर बरीच धक्कादायक माहिती समोर आली असून अशोक खरातचे अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आलेत. दरम्यान या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिकमधील तथाकथित बाबा, मांत्रिक, भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत जो काही प्रकार घडला आहे, तो अत्यंत गंभीर आहे. खरात याने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग आणि दिशाभूल करुन अनेक महिलांसोबत गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात दुरान्वयानेही संबंध असणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मी चौकशी संपल्यावर याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन देईन, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते सोमवारी विधानसभेत यासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
मी यासंदर्भात सभागृहाला अवगत करु इच्छितो की, या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत जलदरित्या कारवाई केली आहे. ट्रॅप लावून कारवाई केली. या प्रकरणात ज्या महिलांची फसवणूक झाली आहे, त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यांना योग्यरित्या धीर देऊन समोर आणले जात आहे. काही महिलांना अशोक खरात याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अजून काही महिला तक्रार करतील, असा अंदाज असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अशोक खरात याच्यावर आता कारवाई झाली असली तरी त्याची तयारी आधीपासून सुरु होती. त्याच्या अटकेच्या आधीही पोलिसांच्या हालचाली सुरु होत्या. 10 मार्चला दुसऱ्या जिल्ह्यातून एका तक्रारीचा उपयोग करुन एनओसी काढून ठेवला होता. जेणेकरुन अशोक खरात याला बाहेर पळता येऊ नये. या प्रकरणात कारवाई सुरु असून अजूनही चौकशी सुरु आहे. हे संपूर्ण प्रकरण राजकारणाचा मुद्दा नसून महिलांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. महिलांचा दुरुपयोग करणं, वेगळं भासवून शक्ती आहे सांगून समर्पण करायला लावणे, तेच तुमचे इतिकर्तव्य आहे, अशाप्रकारे महिलांचे ब्रेनवॉश करण्यात आले. यासंदर्भात मी सभागृहात लवकरच निवेदन सादर करेन, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.