नाशिक जिल्ह्यात घरगुती वापरासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच गॅसचा अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर उपलब्ध होत नाहीत किंवा बुकिंग केल्यानंतर 25 दिवसांनीच सिलिंडर मिळतो, अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अहिरे यांनी सांगितले, की पूर्वी गॅस बुकिंग नोंदणीची मुदत 21 दिवसांची होती. सध्या ही मुदत 25 दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या कालावधीनंतर ग्राहकांना ओटीपी (जढझ) प्राप्त होतो आणि ओटीपी प्राप्त झाल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसांत गॅस सिलेंडर वितरित केले जाते. त्यामुळे ग्राहकांनी गॅस एजन्सीकडे घाई करू नये किंवा अनावश्यक गर्दी करू नये. बुकिंग झाल्यानंतर नियमानुसार काही दिवसांत सिलिंडर उपलब्ध होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच ज्या ग्राहकांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी. केवायसी पूर्ण केल्यास गॅस सिलेंडर मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजारास आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून गॅस एजन्सी आणि हॉटेल्सची नियमित तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 12 गॅस एजन्सी व 21 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळून आलेला नाही, तसेच सध्या गॅस सिलिंडर जादा दराने विक्री होत असल्याबाबत कोणतीही ठोस तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि काही तक्रार असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अहिरे यांनी केले आहे.