इराण अमेरिका युद्धाचा आज पंधरावा दिवस आहे. या आखाती देशातील युद्धामुळे संपूर्ण जगावर मोठा परिणाम होत आहे. अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. इंधन टंचाईची झळ देशासह महाराष्ट्रही बसत आहे. भारतात एलएनजी आणि LPGची टंचाई भासू लागली आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरसाठी रांगाच रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा पसरवल्या जात असल्याचे मंत्री छगन भूजबळ यांनी म्हटले आहे.अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर राज्यातील गॅस सिलेंडर टंचाईबाबत वक्तव्य केले आहे.
मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले ?
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा राज्यात पसरल्या आहेत. राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नसून, नागरिकांनी इंधन किंवा गॅस तुटवड्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने मी जनतेला करत आहे.
राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी ९,००० मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून ते ११,००० मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहावे.
गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा आणि अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने मिळेल, याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा तक्रारींसाठी तालुका व जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष आणि व्हॉट्सअॅप सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरवठा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
#FuelSupplyUpdate
#GasAvailability
#StayCalmStayInformed
#MaharashtraGasSupply
< >