नाशिक : वाहनांमध्ये गॅस भरताना पुरवठा विभागाचा छापा, मालकासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल
नाशिक : वाहनांमध्ये गॅस भरताना पुरवठा विभागाचा छापा, मालकासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (चंद्रशेखर गोसावी) - देशभरात गॅसची टंचाई असताना सातपूर परिसरात गॅस टाकीतून अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरताना पुरवठा विभागाने सोमवारी रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यामुळे खळबळ उडाली असून सुमारे 26 लाख रुपयांची सामुग्री जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सात आरोपींसह एका गॅस एजन्सीच्या मालकाविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या इराण-इराक-अमेरिका असे युद्ध सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅसची टंचाई आहे. शहर आणि जिल्ह्यामध्ये गॅसची टंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र गॅसचा गोरख धंदा हा गॅस एजन्सीच्या मालकाच्या पाठिंब्यामुळे सुरू असल्याची बाब पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यामुळे समोर आली आहे. शहराच्या विविध भागात पुरवठा विभागाच्या वतीने बेकायदेशीर सिलिंडरचा साठा शोधण्याचे काम सुरू आहे. असे असताना राज्यामध्ये प्रथमच अशा स्वरूपाचा छापा टाकून गॅस मालकासह सात जणांचा सहभाग असल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा निरीक्षक  प्रशांत केदारनाथ सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, सोमवारी  संध्याकाळी पावणेसात वाजता जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड  यांनी फोन करून नाईस एरिया, जहागीरदार बेकरीजवळ,  सातपूर एमआयडीसीत जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता टुडे, अप्पर जिल्हाधिकारी  अमोल निकम, एचपीसीएलचे विक्री अधिकारी  भुपेन पाटील, बीपीसीएलचे सेल्स अधिकारी  राजकुमार यादव, लिपिक सुनिल आदींनी एमआयडीसी परिसरात असलेल्या जहागीरदार बेकरीजवळ नादुरुस्त आयशर (क्रमांक एम. एच. 15 बी.जे.2530) या वाहनात एचपीसीएल (घरगुती 14 किलो) व एचपीसीएल (व्यावसायिक पाच किलो) भरलेल्या टाक्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. तसेच जवळ उभे असलेले एम. एच. 12 एल.टी. 6292 या वाहनात देखील रिकामे सिलिंडर मोठ्या प्रमाणात आढळून आले. शेजारी एम. एच. 15 जे. ए. 5416 या अ‍ॅपे मालवाहू रिक्षात, एम. एच. 15 जे.ए.4831 अ‍ॅपे मालवाहू रिक्षा, एम. एच.15 एफ. व्ही. 5085 छोटा हत्ती अशी वाहने गॅस भरण्यासाठी उभी होती. तेथे गॅस सिलिंडर भरण्यासाठी मजुर व गाडी चालक असे 7 जण उभे होते. पुरवठा विभागाने या ठिकाणी छापा टाकल्याचे संबंधितांना सांगितले.

छापा टाकतेवेळी आढळून आलेल्या आरोपींची नावे प्रविण संजय सांकुखे (रा. हेगडेवार चौक सिडको),  समाधान भावसिंग सोळंकी (रा. केवलपार्क, सातपूर-अंबड लिंकरोड), रविंद्र राजेंद्र खंडाळे (रा. एमएसबी कॉलनी, सातपूर), सिंद्धार्थ संजय निराळे (रा. शिवशती चौक, सिडको), तेजस विनोद आढळकर (रा. माऊली लॉन्स), प्रितम मानसिंग राजपूत (रा. आंबेडकर भाजी मार्केटजवळ, सातपूर), व्ही. प्रताप (पूर्ण नाव माहित नाही, रा. कार्बन नाका, शिवाजीनगर, नाशिक) अशी आहेत. 

जिल्हा पुरवठा अधिकारी  रमेश गायकवाड यांनी या इसमास काय करत आहे , असे विचारले असता त्यांनी घरगुती गॅस हा अवैधरित्या एका वाहनातुन दुसर्‍या वाहनात भरुन काळया बाजारात विक्री करत असल्याचे सांगितले. त्यानंतर हा व्यवसाय कोणाचा आहे, याबाबत माहिती घेतली. त्यानंतर या ठिकाणी असलेले  गॅस सिलिंडर जप्त केले त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे 4,92,328 रुपये किंमतीचा 158 एचपीसीएल (घरगुती 14 किलो) भरलेल्या टाक्या आयशर (क्र. एम.एच. 15 बी. जे. 2530) या वाहनात मिळून आलेले 14,440 रुपये किंमतीच्या 10 एचपीसीएल (व्यवसायिक 5 किलो) भरलेला टाक्या आयशर (क्र. एम.एच. 15 बी. जे. 2530) या वाहनात मिळून आले.

6,35,800 रुपये किंमतीच्या 273 एचपीसीएल (घरगुती 14 किलो) (क्र. एम.एच.12 एल.टी. 6292) या वाहनात मिळून आले. रिकाम्या टाक्या 11 हजार रुपये किंमतीचा 11 एचपीसीएल (व्यवसायिक 5 किलोच्या) जवळ खाली पडलेल्या रिकाम्या टाक्या, 20 हजार रुपये किंमतीच्या 5 एचपीसीएल टाक्या, (व्यवसायिक 35 किलो) रिकाम्या टाक्या गाडीजवळ खाली पडलेल्या, 2 लाख रुपये किंमतीचा नादुरुस्त आयशर (क्र. एम. एच. 15 बी. जे. 2530) जुन्या वाहनाची अंदाजे  4,50,000 रुपये किमतीचा,  (क्रमांक एम. एच.12 एल.टी. 6292) जु.वा.कि. अंदाजे 2,50,000 रुपये किंमतीचा एम. एच. 15 एफ. व्ही. 5085 छोटा हत्ती जु.वा.कि. अंदाजे, 02,50,000 रुपये किंमतीचा (एम.एच. 15 जे.ए.5416) छोटा हत्ती जु. वा. कि. अंदाजे, 2,50,000 रुपये किंमतीचा एम. एच. 15 जे.ए.4831 छोटा हत्ती जु.वा. कि. अंदाजे 25 लाख 73 हजार 568  रुपये किंमतीचा अवैधरित्या गॅस सिलेंन्डर व वाहने मिळुन आला आहे.

घरगुती गॅस हे अवैधरित्या एका वाहनातुन दुसर्‍या वाहनात भरुन काळया बाजारात विक्री करत असताना मिळून आल्याने त्याच्या विरुध्द जीवनाश्यक वस्तु अधिनियम 3,7 सह भारतीय न्याय संहिता कलम 287 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group