पत्नीच्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसवर अश्‍लील कमेंट; जाब विचारणार्‍या पतीची हत्या
पत्नीच्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसवर अश्‍लील कमेंट; जाब विचारणार्‍या पतीची हत्या
img
वैष्णवी सांगळे
पालघर (भ्रमर वृत्तसेवा) :- पत्नीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर अश्‍लील कमेंट करणार्‍याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

पालघर जिल्ह्यात मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत नालासोपारा पश्‍चिमेतील हनुमान नगर परिसरात काल पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आफताब शेख (वय 24) असे मयत पतीचे नाव असून या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 आफताब शेख हा पत्नी शबाना (वय 22) हिच्यासोबत नालासोपारा पूर्व येथील प्रगती नगर भागात राहत होता. काल त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे शबानाने आनंद व्यक्त करत व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवले होते.

हे स्टेटस पाहून मेहंदी हसन शेख (वय 22) याने अश्‍लाघ्य कमेंट केली. इतकेच नव्हे तर त्यानंतर इन्स्टाग्रामवरही त्याने शबानाला उद्देशून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या दाम्पत्याने पहाटे आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारण्याचा निर्णय घेतला.

हनुमान नगर येथे झालेल्या या भेटीत सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. मात्र काही क्षणातच वाद चिघळला आणि मेहंदीने चाकू काढून आफताबवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. गंभीर जखमी झालेल्या आफताबचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लग्नाच्या वाढदिवशीच पतीचा मृत्यू झाल्याने शबानावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. आरोपी आणि मयत हे पूर्वी एकमेकांच्या शेजारी राहत असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

धक्कादायक म्हणजे नालासोपारा-वसई परिसरात गेल्या पंधरा दिवसांत घडलेली ही हत्येची पाचवी घटना आहे. विविध कारणांवरुन वाढणारे वाद थेट जीवघेण्या हिंसेपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group