नाशिक न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! दोन शाळकरी मुलींना ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमास 'मरेपर्यंत जन्मठेप'
नाशिक न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! दोन शाळकरी मुलींना ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमास 'मरेपर्यंत जन्मठेप'
img
नितीशा कुलकर्णी





अल्पवयीन मुलींच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या आणि त्यांच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधमास नाशिक जिल्हा न्यायालयाने मोठी चपराक लगावली आहे. सुरगाणा तालुक्यातील या धक्कादायक प्रकरणात आरोपी चंदर गांगोडे याला न्यायालयाने 'मरेपर्यंत जन्मठेपे'ची कठोर शिक्षा सुनावली आहे. समाजातील अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना या निकालामुळे जरब बसणार आहे.

अल्पवयीन मुलींना त्यांचे बाहेर प्रेमसंबंध असल्याची भीती घालून, त्यांच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत अत्याचार करणाऱ्या नराधमास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चंदर दौलत गांगोडे (वय ३५, रा. डांगराळे, ता. सुरगाणा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील दोन्ही पीडित मुली दहावी आणि आठवीत शिकत होत्या. आरोपी चंदर याने २०२१ च्या दिवाळीपासून या दोन्ही मुलींवर वक्रदृष्टी ठेवली. तुमचे दुसऱ्या मुलांसोबत संबंध आहेत, ते मी तुमच्या घरच्यांना सांगेन अशी धमकी देऊन त्याने त्यांना वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर दोन्ही पीडित मुलींनी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

पळून जात असताना एका मुलाने त्यांना हटकले आणि विचारपूस केली असता, सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या न्यायालयात पार पडली. सरकारी पक्षातर्फे अॅड. भानुप्रिया नितीन पेठकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी मांडलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने चंदर गांगोडे याला पोक्सो कलम सहा अन्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद आणि दोन्ही पीडितांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. गुन्ह्याचा तपास सुरगाणा पोलीस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांनी केला होता. दोषसिद्धीसाठी पैरवी अंमलदार वैशाली भोर, विजय बेनके, श्रीकांत पाटील व अश्विनी परदेशी यांनी सहकार्य केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group