६ मे २०२६
नाशिक, वडनेर भैरव : ज्यांच्यावर कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, तेच अधिकारी जेव्हा न्यायालयाच्या आदेशाचा सौदा करतात, तेव्हा काय होते याचे जिवंत उदाहरण नाशिकच्या वडनेर भैरव परिसरात पाहायला मिळाले.
एका शेतकऱ्याला त्याच्या हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी ५० हजारांची लाच मागणाऱ्या मंडल अधिकारी योगिता भोये आता एसीबीच्या कोठडीत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार जमीन ताबा व नोंदी देण्याच्या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकारी योगिता आनंद भोये (वय ३८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (ता. ५) करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या ताब्याबाबत वाद सुरू होता.
या प्रकरणात न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देत जमीन ताबा व नोंदी देण्याचे आदेश महसूल विभागाला दिले होते. त्या अनुषंगाने संबंधित काम पूर्ण करण्यासाठी मंडळ अधिकारी योगिता भोये यांनी सुरुवातीला ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, हवालदार विनोद चौधरी, अनिल गांगोडे, प्रमोद चव्हाणके आदींनी केली.
Copyright ©2026 Bhramar